ओमर खय्याम मृत्यू : डिसेंबर ४, ११२२ -या भाषांतराचाही शेवट !
खय्याम म्हणतो,
असतो मी जर नियंता तर आलोच नसतो,
जाणे माझ्या हातात असते तर कुठे गेलो असतो ?
असतो सुखात जर मी ह्या जगात,
आलो नसतो, गेलोही नसतो आणि राहिलोही नसतो.
मित्रांनो, या जगात आलेल्या प्रत्येक जिवाचा अंत हा होतोच. तसा आपल्या या मित्राचाही अंत झाला. तो कसा, हे खाली वाचा.
याच बरोबर हा रुबायांच्या भाषांतराचा उपक्रमही संपला. अर्थात परत भेट, आपल्याला हे आवडले असेल तर, दुसर्या विषयावर……………खोट बोलण्यात अर्थ नाही, मलाही चुकल्या चुकल्या सारखे वाटेलच…………
आपण सर्वांनी माझा हा प्रयत्न समजवून घेतलात, त्या बद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. या प्रवासात जर कोणाच्या प्रतिक्रियेला उत्तर द्यायचे राहीले असेल तर ते मुद्दामहून नाही हे मी निश्चितपणे सांगू शकतो.
आपला,
जयंत कुलकर्णी.
ओमर खय्याम
मृत्यू : डिसेंबर ४, ११२२
त्यादिवशी बगदादचा इमाम मुहम्मद त्याला भेटायला आला होता. खय्याम त्याच्या आवडत्या जागेवर म्हणजे त्याच्या छोट्याशा बागेतील एका पामच्या झाडाखाली, त्याचा आवडता शास्त्रज्ञ अबू अली सिना, यांचे औषधावरचे पुस्तक वाचत बसला होता. या अबू अली सिनालाच पाश्चात्य जग “ऍव्हिसेना” ह्या नावाने ओळखते. ते पुस्तक वाचत असतानाच त्याला ह्रदयविकाराचा झटका आला. आपला मृत्यू जवळ आल्याचे त्याने ओळखले. खय्यामने पुस्तकात खूण म्हणून एक दिनार ठेवला आणि तो इमामला म्हणाला “मला वाटते माझा काळ जवळ आला आहे. माझ्या सर्व मित्रांना बोलवा. मला त्यांच्याशी एकदा शेवटचे बोलू देत.” मग त्याचे मित्र जमल्यावर गुडघे जमिनीवर टेकून तो म्हणाला
““हे परमेश्वरा, आजवर खरंतर मी यथाशक्ती तुला समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे त्यात काही कमी पडले असेल तर तू मला क्षमा कर. माझे हे तुझ्याबद्दलचे हे ज्ञान खंरतर मी तुला शरण गेल्याचेच चिन्ह आहे.”“
मग तो सावकाश उठला आणि त्याने त्याची शेवटची रुबाया मित्रांसाठी म्हटली.
तो म्हणाला –
“मी आता कंटाळलो आहे माझ्याच चुकांना,
आळशीपणाला, माझ्या वेदनांना आणि दु:खांना.
मृत्यूनंतर जसे तू जीवन देतोस, मलाही तुझ्या आनंदासाठी
या निराकार पोकळीतून बाहेर काढ !”
( खय्याम इथे या जगाला, ज्यात त्याने आयुष्य काढले त्याला एका पोकळीची उपमा देतोय व मला त्यातून घेऊन जा म्हणून विनवतोय ! हा विरोधाभासही लक्षात घ्या. तो स्वत: दुखाला कंटाळलाय पण देवाला म्हणतोय, तु मात्र मला येथुन घेऊन जा आणि आनंदात रहा.)
हे म्हटल्यानंतर त्याने एकेक करुन सर्व मित्रांचा निरोप घेतला आणि तो शांतपणे त्या दिवाणावर पडला. त्या सगळ्यांना दरवाजापर्यंत सोडून इमाम परत आला. तेव्हा ओमर खय्यामने शांतपणे शेवटचा श्वास घेतला होता आणि त्याचा चेहरा प्रसन्न होता.
मित्रहो निशापूरच्या आपल्या मित्राचा अंत हा असा झाला.
त्याच्या मृत्यूची बातमी सर्वदूर पसरली आणि त्याच्या शत्रूंनाही आपल्या जवळचेच कोणीतरी गेल्यासारखे वाटले. त्यानंतर काही वर्षाने त्याचा परममित्र निझामउल्क निशापूरवरुन जात होता, तेव्हा तो मुद्दाम खय्यामची कबर बघायला गेला. त्याचे वर्णन त्याने असे केले –
“” मला ओमरची कबर शोधायला विशेष कष्ट पडले नाहीत. ती एका बागेत मध्यभागी होती. कबरीवर डाळींबाच्या आणि अंजिराच्या झाडांनी सावली धरली होती. त्या झाडांनी त्या कबरीवर पाने वाहिली होती आणि गुलाबांनी त्यांच्या पाकळ्या ! त्याखाली ती कबर पूर्णपणे झाकून गेली होती.““
खय्यामचे नशीब थोर, आजही खय्यामच्या कबरीवर आणि अवतीभोवती असेच गुलाब फुलले आहेत आणि ती एका सुंदर बागेत आहे त्याच्या अंतिम इच्छेप्रमाणे !
जयंत कुलकर्णी.
ओमर खय्यामचे स्मारक




khoopach chhan